62 वर्षांत फक्त पोटासाठी काम केले, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची खंत

विपष्यनेमुळे मी स्वतःला प्रश्न विचारायला शिकलो. चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा खरंच आपण या पुरस्काराच्या योग्यतेचे आहोत का असा प्रश्न मी स्वतःला विचारला. तेव्हा नाही असे उत्तर मला मिळाले. त्याचे कारण म्हणजे अभिनयाच्या माझ्या 62 वर्षांच्या प्रवासात माझ्या वाटय़ाला जे काही आले ते फारसे सुखकारक नाही. माझ्या वाटय़ाला आलेले काम मी पोटासाठी केले. परंतु माझ्या मनाला समाधान देणारे फारसे काही मला करायला मिळाले नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने विक्रम गोखले यांना चित्रभूषण पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात अजूनही मला खूप चांगले काम करायचे आहे असे म्हणत हा पुरस्कार विक्रम गोखले यांनी देशातली रूपेरी पडद्यावर काम करणारी पहिली स्त्राr दुर्गाबाई कामत आणि पहिल्या महिला बालकलाकार कमलाबाई गोखले यांना समर्पित केला. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

गरजू कलावंतांसाठी निधी उभारा!
मराठी चित्रपटांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचूनही काही कलाकारांना उतारवयात संकटांचा सामना कराला लागतो, अशा कलाकारांच्या मदतीसाठी निधी उभारला पाहिजे, त्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. यावेळी विक्रम गोखले यांनी पुरस्काराच्या रकमेत तेवढीच रक्कम टाकून 1 लाख रुपयांचा निधीदेखील अशा गरजू कलावंतांच्या मदतीसाठी महामंडळाकडे सुपूर्द केला.

– मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कार सोहळा सोमवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात रंगला. यावेळी ‘चित्रभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगणा लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे, निर्माते किशोर मिस्कीन यांना प्रदान करण्यात आला.

– चित्रकर्मी पुरस्कार दिग्दर्शक रमेश साळगावकर, संकलक, दिग्दर्शक संजीव नाईक, अभिनेते विलास उजवणे, संगीत संयोजक आप्पा वढावकर, नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडीत, ध्वनीलेखक प्रशांत पाताडे, संकलक दिपक विरकूड, संकलक विलास रानडे, गायक विनय मांडके, छायाचित्रलेखक जयवंत राऊत, अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री, निर्माती प्रेमाकिरण, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेता चेतन दळवी, संगीतकार अच्युत ठाकुर, निर्माता-अभिनेता वसंत इंगळे यांना प्रदान करण्यात आला.

You might also like

Comments are closed.